चैत्री यात्रेत या वेळेपर्यंत सुरू राहणार मुखदर्शन!

विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने १५ ते २१ एप्रिल या कालावधीत पहाटे ५ ते रा. ११ पर्यंत फक्त मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात येत आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली.चैत्री यात्रा कालावधीत श्री. विठ्ठल- रुक्मिणी मंदिराशी संबंधित असलेल्या परंपरांचे कटाक्षपणे पालन करण्यात येणार असून, त्याबाबतचे आवश्यक नियोजन करण्यात आले आहे.

त्यामध्ये नवमीला श्रीरामनवमी जन्मोत्सवानिमित्त विठ्ठल महाराज देहूकर फड (बिद्रीकर मंडळी) ह.भ.प. श्रीकांत महाराज पातकर, पंढरपूर यांचे कीर्तन, ह.भ.प. आजरेकर महाराज पंढरपूर यांचा द्वादशीला नैवेद्य,

त्रयोदशीला ह.भ.प.गुरू बाबासाहेब आजरेकर महाराज, पंढरपूर यांचे कीर्तनाची परंपरा असून, एकादशीला पहाटे ‘श्रीं’ची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न होत आहे.आपत्कालिन व्यवस्थेच्या दृष्टीने सोलापूर महानगरपालिका यांचेकडील रेस्क्यू व्हॅन प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह, सिझफायर यंत्रणा, अत्याधुनिक १०० नग सीसीटीव्ही कॅमेरे व त्यासाठी कंट्रोल रूम, वायरलेस यंत्रणा, जनरेटर, मेटल डिटेक्टर, मोबाईल लॉकर, चप्पल स्टँड, सार्वजनिक प्रसारण सूचना प्रणाली, चौकशी कक्ष, बॅग स्कॅनर मशीन, अपघात विमा पॉलिसी इ. व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य व्यवस्थेसाठी पत्राशेड येथे तालुका आरोग्य विभागाचा वैद्यकीय कक्ष, उपजिल्हा रुग्णालयामार्फत दर्शन मंडप येथे आयसीयू तसेच माळवदावर वैष्णव चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्याकडून मोफत वैद्यकीय सेवा क मंदिर परिसरात वैद्यकीय पथकासह दोन अद्यावत रुग्णवाहिका ठेवण्यात येत आहेत.