समाजातील प्रत्येक वर्गाचा तसेच प्रत्येक वयोगटाचा विचार करून केंद्र सरकार वेगवेगळ्या योजना लागू करते. वृद्धापकाळात लोकांना आर्थिक चणचण भासू नये म्हणून केंद्र सरकारने अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) चालू केली आहे. या योजनेअंतर्गत पैशांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला म्हातारपणी पाच हजार रुपये प्रतिमहिना मिळू शकतो. याच पार्श्वभूमीवर ही योजना काय आहे? या योजनेत कशा प्रकारे गुंतवणूक करावी? हे जाणून घेऊया…
तुमचे वय 18 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना या योजनेत गुंतवणूक करता येते. या योजनेत गुंतवणूक केल्यास वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर महिन्याला एक निश्चित रक्कम मिळते. ही रक्कम पेन्शन म्हणून वापरता येते. विशेष म्हणजे ही एक शासकीय योजना असल्यामुळे त्यात कोणत्याही प्रकारचा धोका नाही.
अटल पेन्शन योजनेअंतर्गत वयाच्या साठ वर्षांनंतर पेन्शन म्हणून एक निश्चित रक्कम मिळू शकते. तुम्ही या योजनेत गुंतवलेल्या पैशांनुसार तुम्हाला 1000 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंतचे पेन्शन दिले जाते. या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर कमीत कमी 20 वर्षे गुंतवणूक करणे गरजेचे आहे. एखादी व्यक्ती वयाच्या 18 व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत पैशांची गुंतवणूक करत असेल तर त्या व्यक्तीला दिवसाला फक्त सात रुपये जमा करावे लागतील. म्हणजेच 18 व्या वर्षापासून महिन्याला 210 रुपये जमा केल्यास तुम्हाला वयाच्या 60 वर्षांनंतर पाच हजार रुपये प्रतिमहिना पेन्शन मिळेल.
तुम्हाला 1000 रुपये पेन्शन हवे असेल तर 18 व्या वर्षापासून तुम्हाला प्रतिमहिना फक्त 42 रुपये गुंतवावे लागतील.या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे बँकेत खाते असणे गरजेचे आहे. यासह तुमच्याकडे मोबाईल क्रमांक असणे गरजेचे आहे. कोणत्याही बँकेत जाऊन अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करता येतो. सध्या या योजनेत देशभरात एकूण 5 कोटीपेक्षा अधिक लोक पैशांची गुंतवणूक करतात.