ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २००० नुसार प्राप्त अधिकारान्वये जिल्हाधिकारी जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी वर्षभरातील विशिष्ट सण उत्सवादिवशी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यासाठी सवलत देण्याबाबत दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी आदेश जारी केले होते. या आदेशानुसार सांगली जिल्ह्यात विशिष्ट सण, उत्सवासाठी ध्वनीची विहित मर्यादा राखून कार्यक्रमासाठी ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली होती.
तथापी आचारसंहितेच्या कालावधीत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक न लावण्याबाबत निर्देश प्राप्त असल्याने आचारसंहिता कालावधीत रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक लावण्यास / वापरण्यास मनाई केली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे. दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजीच्या आदेशान्वये शिवजयंती (१ दिवस), ईद-ए- मिलाद (१ दिवस), डॉ. आंबेडकर जयंती ( १ दिवस),
१ मे महाराष्ट्र दिन (१ दिवस) गणपती उत्सव (गणेश चतुर्थी, पांचवा दिवस, सातवा दिवस, नववा दिवस, अनंत चतुर्दशी, असे ५ दिवस), नवरात्री उत्सव (अष्टमी व नवमी, असे २ दिवस), दिवाळी (१ दिवस लक्ष्मीपूजन), ख्रिसमस (१ दिवस), ३१ डिसेंबर (१ दिवस) तसेच उर्वरित १ दिवस ( जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेने महत्वाच्या कार्यक्रमासाठी आवश्यकतेनुसार सूट) ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक वापरण्यास सकाळी ६ वाजल्यापासून ते रात्री १२ वाजेपर्यंत सवलत देण्यात आली होती.