बागणी येथील कचरा डेपो हलविण्याची मागणी… आरोग्यावर गंभीर परिणाम

अलीकडे स्वच्छतेच्या बाबतीत गावागावात तयारी सुरु आहे. कारण अस्वच्छतेमुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेक भागात घंटागाडी देखील येऊन कचरा उठाव करीत आहे. पण अनेक भागात कचरा प्रचंड गोळा होऊनही त्या कचऱ्याची विल्हेवाट वेळेवर होत नाही. त्यामुळे संतप्त भावना नागरिकांमध्ये निर्माण होते. अनेक भागात तर भरमसाठ कचरा साठवून मग तो पेटवून दिला जातो. त्यामुळे मग धुराचे लोट हवेत मोठया प्रमाणात दिसत राहतात.
लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीने येथील तळ्यातील कचरा डेपो हलविणेबाबत ग्रामविकास अधिकारी कुमार भिंगारदेवे यांना सुनील वारे, निळकंठ देवकुळे, वैभव पाटसुपे यांनी निवेदन दिले.

यावेळी देवकुळे म्हणाले येथील किल्ला परिसराजवळ असलेल्या तळ्यामध्ये कचरा डेपो केला असून दररोज संध्याकाळी त्याला आग लावली जात आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरातील राजर्षी शाहूनगर, किल्लाभाग तसेच जि. प. शाळा बागणी नं. १ व २ या परिसरात नेहमी धुराचे साम्राज्य पसरलेले असते.

येथील बसस्थानक परिसरातील प्रवासी, रहिवासी तसेच शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. तसेच यांच्या आरोग्यास हवेच्या प्रदुषणामुळे धोका निर्माण झालेला आहे. बऱ्याच नागरिकांना दम्यासारख्या श्वसनविकारांना सामोरे जावे लागत आहे. तरी येथील रहिवासी व भावी पिढीच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी सदरचा कचरा डेपो इतरत्र हलविण्यात यावा अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.