मुलींवर अत्याचार केल्याप्रकरणी सुनील बाळू बुडके (वय ३६, रा. शाहूनगर, चंदूर) याला दोषी ठरवून येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एम. आर. नेरलेकर यांनी ८ वर्षांचा सश्रम कारावास आणि ९ हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे अॅड. एच. एन. मोहिते-पाटील यांनी काम पाहिले.
पीडितेपैकी एक अल्पवयीन मुलगी आपल्या आजीसोबत राहत होती. २६ जून २०१६ रोजी वृद्ध महिलेची सहा वर्षांची नात व तिची मैत्रीण अशा दोघीजणी घरासमोर खेळत होत्या. यावेळी बुडके याने या दोन्ही अल्पवयीन मुलींना घरात बोलावून घेतले आणि त्यांच्यावर बळजबरीने अत्याचार केले.
याप्रकरणी पीडित बालिकेच्या नातेवाइकांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार बुडके याच्यावर भादंवि कलम ३७६ व लहान मुलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कलम २०१२ अन्वये कलम ४, ८ व १२ नुसार गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणाचा तपास करून सहायक पोलिस निरीक्षक वाय. आर. खाडे यांनी येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते