महिलांना फसवणारी टोळी गजाआड! विटा पोलिसांची कारवाई

महिलांना लिफ्ट देऊन गाडीत बसवून चोरी करणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील टोळीला विटा पोलिसांनी पकडले. याप्रकरणी नेवरी (ता. कडेगाव) येथील कौशल्या अधिकराव महाडिक यांनी फिर्याद दिली होती. लक्ष्मी उमेश खडतरे ऊर्फ बद्री पवार (वय ३०, रा. सोलापूर), उमेश बापू खडतरे (वय ३० रा. चिंतामणीनगर, सोलापूर), सचिन शिवाजी पवार (वय ३५, रा. तांबोळे, ता. माहोळ), दीपा सचिन पवार, वय ३० रा. तांबोळे, ता. माहोळ) अशी या टोळीतील संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चारचाकी गाडीसह सव्वातीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याबाबत विट्याचे पोलिस निरीक्षक शरद मेमाणे यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात ३ मार्च रोजी कडेगाव तालुक्यातील नेवरी येथील कौशल्या महाडिक यांना रेणावी गावाकडून विट्याला यायचे होते. मात्र वाहन मिळत नव्हते. त्याचवेळी दुपारी एक कार (एम. एच. १२ई.जी. ४०२८) ही विट्याकडे निघाली होती. त्यांनी लिफ्ट मागितली. त्यावेळी गाडीतील लक्ष्मी खडतरे, उमेश खडतरे, सचिन पवार आणि दीपा पवार यांनी कौशल्या महाडिक यांना सीट बेल्ट लावण्यास सांगितले.

त्यावर त्या सीट बेल्ट लावण्यात गुंतलेल्या असताना त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅमचे २ लाख ४ हजार रुपयांचे सोन्याचे गंठण, ६८ हजार रुपयांचे १० ग्रॅमचे सोन्याचे २ मंगळसूत्र आणि ४० हजार ८०० रुपयांची ४ ग्रॅम वजनाची बोरमाळ व २ ग्रॅम वजनाची कर्णफुले आणि २ लाख रुपयांची गाडी असा एकूण ५ लाख १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल चोरला होता. तो विटा पोलिसांनी जप्त केला आहे. सर्व संशयितांनी यापूर्वी अनेक चोऱ्या, जबरी चोरी यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सचिन पवार आणि दीपा पवार हे दोघे पती-पत्नी असून ते दौंड येथील पोलिस ठाण्यात ६ गुन्ह्यात पाहिजे असलेले आरोपी आहेत.