शाळांना २ मेपासून उन्हाळा सुटी! १५ जूनपासून उघडणार शाळा…..

राज्यातील राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना २ मेपासून उन्हाळी सुट्टी राहील, असे आदेश गुरुवारी (ता. १८) शिक्षण संचालकांनी काढले आहेत. तर आगामी शैक्षणिक वर्षाची सुरवात १५ जूनपासून होईल, असेही त्यांनी आदेशातून स्पष्ट केले आहे.

राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना २ मेपासून उन्हाळी सुटी जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरु असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास त्यांनी विद्यार्थ्यांना कधीपासून उन्हाळी सुटी द्यायची याचा योग्य तो निर्णय घ्यावा, असेही शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे.

आगामी शैक्षणिक वर्ष विदर्भ वगळता उर्वरित विभागांमधील शाळा १५ जूनपासून सुरु होतील, असे आदेश प्राथमिकचे शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे संचालक संपत सूर्यवंशी यांनी काढले आहेत. जून महिन्यातील विदर्भातील तापमान विचारात घेता उन्हाळी सुटीनंतर तेथील राज्य मंडळांच्या सर्व शाळा ३० जूनपासून सुरु होतील. पण त्यावेळी रविवार येत असल्याने १ जुलैपासून विदर्भातील शाळा सुरू होतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.

इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना यंदापासून शालेय परीक्षा उत्तीर्ण होण्याचे बंधन आहे. त्यांच्या परीक्षा नुकत्याच पार पडल्या आहेत. आता त्यांचा निकाल नेहमीप्रमाणे १ मे रोजी प्रसिद्ध होईल. त्यात इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गातील जे विद्यार्थी अनुत्तीर्ण होतील, त्यांना शाळा सुरु होण्यापूर्वी पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. ही परीक्षा साधारणत: १० जूनपूर्वी घेतल्या जाणार आहेत. त्या परीक्षेत मात्र अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पास व्हावेच लागेल, अन्यथा त्यांना त्याच वर्गात बसावे लागणार आहे.