खानापूर तालुक्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपक्रम

खानापूर तालुक्यात जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी व्हावी यासाठी प्रशासनाच्यावतीने प्राथमिक स्तरापासून महाविद्यालयस्तरापर्यंत सर्वच ठिकाणी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. बळवंत कॉलेजमध्ये पंचायत समितीच्या शिक्षण विभाग, राष्ट्रीय सेवा योजना आणि ज्युनियर विभागाच्यावतीने मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.

यावेळी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी विकास राजे, उपप्राचार्य विष्णू मस्के, डॉ. प्रवीण बाबर, नवनाथ कदम, डॉ. सदानंद पोळ आदी उपस्थित होते. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी निबंध, वक्तृत्व, रॅली, व्याख्याने आयोजित करण्यात येत आहेत. शिवाय लग्नसमारंभ, सभा, संमेलने, शाळा, क्रीडा कला महोत्सव, सर्कस अशा सर्व ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचून मतदान जागृती करीत आहोत, असे राजे यांनी सांगितले.