मा. सुहासभैय्या बाबर यांच्या विरोधात नेमके कोण?

खानापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय पटलावर मतदारसंघांमध्ये सुहासभैय्या बाबर, वैभव पाटील आणि पडळकर या गटातच टोकाचा संघर्ष राहिलेला आहे. आगामी विधानसभेला मात्र राजकीय समीकरणाचे फासे हे कसे पडणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली आहे. अनिलभाऊ बाबर यांच्या पश्चात त्यांचे पुत्र माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुहासभैय्या बाबर हे राजकीय पटलावर सक्रिय झालेले आहेत. त्यांनी आता विधानसभा निवडणुकीवर आपले लक्ष केंद्रित करत तयारीला देखील लागलेले आहेत. त्यांनी साखरपेरणी सुरू केलेली आहे.

मा. सदाशिवराव पाटील यांचे सुपुत्र मा. वैभव पाटील यांनी आपल्या गटाच्या नेतृत्वाची धुरा हाती घेत आमदार राष्ट्रवादीचाच असाच निर्धार करत मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केलेली आहे. विधानसभा निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने शड्डू ठोकुन ही तयारी सुरू केलेली आहे. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर हे देखील विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत पडळकर बंधूंनी खानापूर विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केलेले आहे.

खानापूर, आटपाडी व विसापूर सर्कलमध्ये आपला जनसंपर्क त्यांनी वाढवलेला आहे. युवा नेत्यांचे भावी आमदार म्हणून ब्रॅण्डिंग सुरू झालेले आहे. सुहासभैय्या बाबर यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी वैभव पाटील कोणत्या पक्षातून उमेदवारी करणार? यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेल नाही. तर ब्रह्मानंद पडळकर यांनी देखील आगामी निवडणूक लढविण्याचा निर्धार केला आहे त्यामुळे विधानसभेवेळी सुहासभैय्या बाबर यांच्या विरोधात नेमके कोण? हे अद्याप देखील गुलदस्त्यात आहे.