हिंदी सक्ती विरोधात निदर्शने करणार

इचलकरंजी, महाराष्ट्र राज्य सरकारने चालू शैक्षणिक धोरणात इयत्ता पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमात वैभाषिक सत्रानुसार हिंदी (Hindi) भाषा सक्तीची केली आहे, याच्या विरोधात महाराष्ट्रातील मराठी भाषिक पक्षभेद बाजूला ठेवून एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर इचलकरंजी काँग्रेस कमिटी येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, माकप व इतर घटक पक्ष संघटनांची व्यापक बैठक झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रदेश काँग्रेस सचिव शशांक बावचकर होते.

 बैठकीमध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरोधात एकमत होऊन न मराठी माणसासाठी एक जुट दाखवण्याचा निर्णय घेण्यात आला. मनसे प्रमुख राज ठाकरे व शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सर्व पक्षाने एकत्र येण्याचे आवाहन केले तरी सर्व पक्ष मराठी भाषेच्या मुद्दयावर एकत्र आले आहेत. यामुळे सर्व पक्षांशी संपर्क साधत असता सर्वांनी एकत्र येऊन बैठक घेतली. या बैठकीत ४ जुलै रोजी महात्मा गांधी पुतळ्याजवळ शहरातील सर्व पक्षाच्या वतीने निदर्शन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे आयोजक कोणताही पक्ष व संघटन नसेल व संघटनेचा झेंडा नसेल. केवळ मराठीचा अजेंडा असेल व मराठी भाषेवर प्रेम करणाऱ्यांनी मराठी माणसांनी आणि हिंदी भाषा सक्तीच्या विरोध शहरातील सर्व पालक विद्यार्थी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी उबाठा इचलकरंजी शहर अध्यक्ष सयाजी चव्हाण, माकपचे ब्रह्मा कांबळे, अमर जाधव, मलकरी लवटे, जिल्हा सचिव सदा मलाबादे, बजरंग लोणारी, नितीन कटके, ऋषिकेश मराठे, तन्मय तांबे यांचेसह अन्य प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.