पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतचे वर्ग सकाळी ९ नंतर भरविण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर विद्यार्थी, पालक व बसचालकांमधूनही तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या सर्वांच्या समस्या ऐकून घेणार असून, त्यावर आचारसंहितेनंतर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.बदलत्या वेळापत्रकामुळे माध्यमिक शाळांचे वेळापत्रक कोलमडत असेल आणि वर्गखोल्यांचा प्रश्न येत असेल, तर ‘माध्यमिक’चे वर्ग सकाळी लवकर भरवू, असे संकेतही त्यांनी दिले.
लहान मुलांच्या झोपेचे कारण देत राज्य सरकारने वेळ बदलली आहे.पालक, बसचालकांचा विरोध, वर्गखोल्यांची संख्या, सकाळच्या वेळेतील वाहतूक कोंडी, प्रदूषण या समस्याही उद्भवणार असल्याचे मंत्री केसरकर यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी प्रत्येकाने त्यांना भेडसावणारे प्रश्न मांडावेत. ते सविस्तर ऐकून घेतले जातील, अशी ग्वाही दिली.
सकाळच्या शाळेमुळे लहान मुलांची पुरेशी झोप होत नसल्याचे शास्त्रज्ञांनीच सांगितले आहे. त्यामुळे पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळांच्या वेळेत बदल केला आहे. यामुळे पालक, बसचालक यांच्यावर काही परिणाम होत असेल, तर त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या जातील. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर यावर तोडगा काढला जाईल असे दीपक केसरकर यांनी सांगितले.