‘ईअर टॅगिंग’शिवाय जनावरांची वाहतूक बंद! 1 जूनपासून….

जनावरांची बेकायदा होणारी वाहतूक रोखण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ‘ईअर टॅगिंग’शिवाय इतर राज्यांतील जनावरे महाराष्ट्रात येण्यास बंदी घातली आहे.तसेच, १ जूनपासून ईअर टॅग नसलेली जनावरे बाजार समित्या, आठवडी बाजार आणि गावागावांतील खरेदी-विक्री करण्यास प्रतिबंध केल्याने बेकायदा कत्तलींना आळा बसेल. केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने ‘नॅशनल डिजिटल लाइव्ह स्टॉक मिशन भारत पशुधन प्रणाली’ कार्यान्वित केली आहे. ( Transport of animals stopped without ear tagging )

या प्रणालीत ईअर टॅगिंग (१२ अंकी बार कोड)च्या नोंदी घेण्यात येत आहेत. यात जन्म-मृत्यू नोंदणी, प्रतिबंधात्मक लसीकरण व औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण यांचा समावेश आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांमार्फत जनावरांच्या कानात टॅग (बिल्ला) लावून त्याची भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील सर्व पशुधनाची सर्वंकष माहिती एका ठिकाणी उपलब्ध होईल. जेणे करून पशुधनामधील सांसर्गिक रोगांना प्रतिबंध व नियंत्रण करण्याकरिता मदत होणार आहे.