नवरात्रोत्सव कोल्हापुरकरांसाठी खास असतो. तशी कोल्हापुरकरांवर देवीचा आशीर्वाद नेहमीच असतो. पण, या नऊ दिवसातही कोल्हापुरातले भाविक पहाटे काकडआरतीलाही मंदिरात गर्दी करतात. करवीरची आई असलेली अंबामाता एका राक्षसाच्या वधासाठी कोल्हापुरात आली. तिने वध केला अन् ती करवीर क्षेत्रीच राहीली.
करवीर निवासिनी आई अंबाबाईची आज गजारूढ रूपात पूजा बांधण्यात आली आहे. कोल्हापुरकरांसाठी नवरात्रीची पाचवी माळ ही खूप महत्त्वाची मानली जाते. कारण, यादिवशी आई अंबाबाई पालखीत बसून शहराबाहेर असलेल्या आपल्या बहिणीला म्हणजेच त्र्यंबोलीदेवीच्या भेटीला जाते. ती भवानी मंडपातून राजारामपूरीहून पुढे जात शहराचं शेवटचं टोक असलेल्या टेंबलाई टेकडीवर जाते.
अंबामातेने त्र्यंबोली देवीला एक वचन दिलं होतं.ते वचन पाळण्याची परंपरा अनादी काळापासून सुरू आहे. आजही लोक ती परंपरा विसरत नाहीत.पण, २०१९ च्या ललिता पंचमीला मात्र या परंपरेला गालबोट लागले.
अंबामाता अन् त्र्यंबोली देवीची भेट तर झालीच पण तिथे सुरू असलेली एक परंपरा पाळली गेली नाही. त्यामुळे आई अंबाबाईने त्र्यंबोली देवीला दिलेले वचन पूर्ण झाले नव्हते. ते कोणते अन् काय होता तो प्रसंग पाहुयात.
प्राचीन काळी केशी राक्षसाचा मुलगा कोल्हासूर हा येथे राज्य करीत होता. तो महाभयकर राक्षस होता. त्याने राज्यात अनाचार करून देवांना त्रास दिला. म्हणून देवांनी देवीचा धावा केला. देवांच्या विनंतीवरून श्री महालक्ष्मीने राक्षसाच्या वधाची तयारी केली. श्री महालक्ष्मीने ब्रह्मास्त्राने राक्षसाचे मस्तक उडवून दिले. त्या राक्षसाच्या शरीराचा कोहळा झाला. आश्विन पुराणातून पंचमीस हा कोल्हासूर वधाचा प्रसंग झाला.
अंबाबाईने कोल्हासूराचा वध केला. पण असूर मरताना त्याने तीन वर मागितले एक या क्षेत्राला माझे नाव दे म्हणून हे कोल्हापूर. दुसरं या क्षेत्राला गयेच पावित्र्य दे म्हणून अंबाबाईने रौद्री गया तयार केली आणि तिसरं दरवर्षी माझ्या नावाने कोहळ्याचा बळी दे!
जगदंबा त्याला तथास्तू म्हणाली त्यानंतर कित्येक वर्षे हा सोहळा देवीच्या मंदिरात मुक्ती मंडपात व्हायचा. योगिनी चामुंडा एक कोहळा आणून मुक्ती मंडपात मांडायच्या त्याला गंध फूल अक्षता वहायच्या गुग्गुळ धूप दीप दाखवायच्या.
गुळ चणे नैवेद्य अर्पण करायच्या मग महालक्ष्मी कुमारीका रूप धारण करून त्या कोहळ्याचे त्रिशुळाने तुकडे करायची देठाकडच्या अर्ध्या भागावर कुंकू लावून तो स्वतः स्विकारायची उर्वरित अर्ध्या भागाचे पाच भाग करून ते पाच देवतांना द्यायची.
बराच काळ लोटला, पुढे कामाक्ष नावाच्या कोल्हासुराच्या नातवाने कपिल मुनींकडून योगदंड मिळवला. त्याच्या प्रभावाने त्याने महालक्ष्मी सह सर्व देवांचे रूपांतर बक-यांमध्ये केले. हे कळताच त्र्यंबुलीने कामाक्षाचा वध केला आणि सर्व देवांची सुटका केली. पण ते त्र्यंबुलीचे आभार मानायचे विसरून गेले त्यामुळे त्र्यंबुली रागाने शहरा बाहेर टेकडीवर जाऊन बसली.
तिची समजूत घालायला स्वतः महालक्ष्मी तिथे गेली व तिने त्र्यंबुली ला आश्र्वासन दिले यापुढे तू करवीरची पालन कर्ती असशील इथल्या लोकांना काय फळ द्यायच ते तू ठरवशील आणि जो कोहळा मी मुक्ती मंडपात फोडते तो तुझ्या नजरेत समोर तुझ्या मंदिरात करेन.
हि परंपरा कित्तेक वर्ष पाळली जातेय. पण २०१९ च्या ललिता पंचमीदिवशी मात्र आई अंबाबाईनं त्र्य़ंबोली मातेला दिलेलं वचन कोल्हापुरकरांनी पाळलं नाही. २०१९ च्या ललिता पंचमी दिवशीही करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी टेंबलाबाईच्या भेटीला आली. गाभाऱ्यात गेली त्र्यंबुलीची गळाभेट घेतली. बाहेर येऊन कुमारीकेला आशिर्वाद दिला.
महाराजांनी जाऊन त्र्यंबुलीच दर्शन घेतले मंडपात आले. कुमारिका पूजन केले आणि बावड्याच्या गावकामगार पाटलांनी कोहळ्याला नुसता त्रिशूल लावताच चारी बाजूंनी हुल्लडबाज तरूणांनी कोहळा न फोडताच पळवला.
मंदिरातील पुजाऱ्यांनी, सेवकांनी कोहळा पुन्हा फोडावा म्हणून प्रयत्न केले. पण टेंबलाबाईच्या नजरेसमोर कोहळा फुटलाच नाही तिला या बलीचा हिस्सा मिळालाच नव्हता. कोहळा फुटला पण तो देवीच्या नजरेसमोर नव्हता अन् कुमारिकेच्या हस्तेही नव्हता. त्यामुळे हजारो वर्ष चालत आलेल्या या परंपरेला गालबोट लागले होते.
कोहळा न फोडताच देवीची पालखीही परतली. तर तिथे झालेली गर्दी पांगवणेही हाताबाहेर गेले होते. अखेर पोलिसांनीच यात लक्ष घालून गर्दी कमी करण्यात आली होती.