अंबामातेचा अखंड जयघोष आणि भक्तिमय वातावरणात आज करवीर निवासिनी श्री अंबाबाई , तुळजाभवानी आणि त्र्यंबोली देवीच्या भेटीचा रम्य सोहळा विधिवत पार पडला. अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे ललितापंचमी आज उदंड उत्साहात पार पडली. दरम्यान कोहळा फोडल्यानंतर कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी पोलीस आणि भाविकांमध्ये जोरदार धक्काबुक्की झाली. त्यामुळे मंदिरात काहीकाळ गोंधळ उडाला होता.
सोहळ्यानंतर परंपरेने कुमारिकेच्या हस्ते कोहळारुपी राक्षसाचा वध करून कुष्मांड विधी करण्यात आला. संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते कुमारिकेचे आणि देवीचे पूजन करून कुष्मांड विधी पार पडला. नवरात्रोत्सवाची पाचवी माळ ललितापंचमीची म्हणजेच टेंबलाईवाडी येथील त्र्यंबोली देवीच्या यात्रेची असते. परंपरेनुसार शाही लवाजम्यासह तोफेची सलामी दिल्यानंतर देवीची सोन्याची पालखी मंदिराच्या मुख्य दरवाजातून टेंबलाईवाडीकडे मार्गस्थ झाली.
शारदीय नवरात्रोत्सवातील महत्त्वाचा दिवस मानल्या जाणाऱ्या अंबाबाई त्र्यंबोली भेटीचा सोहळा आज ललिता पंचमीच्या दिवशी धार्मिक वातावरणात संपन्न झाला . कोल्हासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कोहळा फोडण्याचा विधी त्र्यंबोली मंदिरात होत असल्याने या परिसराला जत्रेचं स्वरूप प्राप्त झालं होत . दुपारी बारा वाजता युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत या मंदिरातील पुजेचा मान असणाऱ्या गुरव घराण्यातील कुमारीका निधी श्रीकांत गुरव हिच्या हस्ते देवी समोर पारंपरिक पद्धतीने कोहळा फोडण्याचा सोहळा संपन्न झाला. यावेळी त्रीशुलीने कोहळा फोडल्यानंतर कोहळ्याचा तुकडा प्रसाद म्हणून घेण्यासाठी नेहमी भाविकांची गर्दी होत असते. मात्र यंदा पोलीस आणि देवस्थान समितीचे मानकरी आणि उपस्थित भक्तांमध्ये चढाओढ झाली. अक्षरश पोलिसांना धक्काबुक्की करत हा कोहळा तुकडा मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मंदिर परिसरात एकाच गोंधळ उडाला.