कोल्हापूर शहराव्यतिरिक्त जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपून काढले. हातकणंगले, शिरोळ, भुदरगड, मौजे पेरणोली व वाटंगीसह तालुक्याच्या ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. यामध्ये, मोठमोठी झाडे उन्मळून लाखोंचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात काल दुपारनंतर झालेल्या वळीव पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. मौजे दिंडेवाडी (ता. भुदरगड) येथील विलास वीराप्पा कलकुटकी यांच्या राहत्या घरी वादळी वाऱ्याच्या पावसाने वडाचे झाड कोसळले.
अतिग्रे (ता. हातकणंगले) येथे वादळी वाऱ्यामुळे दोन घरांचे पत्रे उडाले आहेत. शिवानंद बाळासो निंबाळकर याचे ३० हजार रुपयांचे तर बाळासो पाटील यांचे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तर आजरा येथील इकबाल सुलेमान हकीम यांच्या घराचे पत्रे उडून दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.