कोल्हापुरातील शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आज (27 एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कोल्हापुरामध्ये जाहीर सभा होत आहे. कोल्हापुरातील तपोवन मैदानामध्ये हि सभा होत असून या सभेसाठी महायुतीच्या नेत्यांकडून गेल्या दोन दिवसांपासून जोरदार तयारी सुरू आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी चांगलीच कंबर कसली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरच्या जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्यासाठी सर्वस्व पणाला लावलं आहे. त्यांच्या गेल्या काही दिवसांपासूनच्या सातत्याने होत असलेल्या दौऱ्यावरून हे स्पष्ट झालं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अचानक नियोजित करून सभा होत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक दिवस अगोदरच कोल्हापूरमध्ये येत तंबू ठोकला आहे.
शिंदे यांनी काल (26 एप्रिल) रात्री दहाच्या सुमारास तपोवन मैदानात भेट देत तयारीची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत संजय मंडलिक, धैर्यशील माने यांच्यासह गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे सुद्धा उपस्थित होते. माजी आमदार राजेश क्षीरसागर सुद्धा यावेळी त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी त्यांनी तयारीचा आढावा घेतला. सभेला गर्दी जमवण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना टार्गेट देण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये मोदींची सभा यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.