रात्री १२ ते पहाटे १ नंतरही ऑकेस्ट्रा बार सुरू ठेवल्याप्रकरणी सातत्याने ग्रामीण भागातील ऑर्केस्ट्रा बार चालकांवर सोलापूर तालुका पोलिसांच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली.पण, काटेकोरपणे नियमांचे पालन होत नव्हते. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ग्रामीण हद्दीतील सहा ऑर्केस्ट्रा बारवर कडक कारवाई केली.
चौघांचे परवाने कायमस्वरूपी रद्द तर दोघांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबित केला आहे.ऑर्केस्ट्रा बारसाठी पोलिसांच्या माध्यमातून परवानगी दिली जाते, पण त्यासाठी ठराविक अटी व नियम घालून देण्यात आले आहेत. पैसे उधळता येत नाहीत, बैठक व्यवस्था स्वतंत्र हवी, अश्लील हावभाव, ऑर्केस्ट्रा बारमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असावेत, ऑर्केस्ट्रा बार रात्री किती वाजेपर्यंत सुरू असावा, शासंदर्भातील ते नियम आहेत. मात्र, शासनाने ठरवून दिलेले नियम सर्रासपणे कागदावरच राहतात अशी वस्तुस्थिती पोलिसांना अनेकदा कारवाईवेळी आढळली आहे.
सातत्याने कारवाई करून, त्यांना नियम व अटींचे पालन करा म्हणून सूचना करूनही त्याठिकाणी परिस्थिती ‘जैसे थे’च राहिली. त्यामुळे ग्रामीण पोलिसांनी संबंधित ऑर्केस्ट्रा बारचे परवाने रद्द व निलंबित करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांना पाठविला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित ऑर्केस्ट्रा बार चालकांना दणका दिला आहे.
पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रितम यावलकर, उपअधीक्षक संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नामदेव शिंदे यांची कामगिरी कौतुकास्पद राहिली आहे. त्यांनीच या ऑर्केस्ट्रा बारवर सातत्याने वॉच ठेवून कारवाई केली होती. ग्रामीण पोलिसांनी यासंदर्भातील माहिती गुरुवारी (ता. २५) विशेष पोलिस महानिरीक्षक यांना सादर केली आहे.