हातकणंगले मतदारसंघात तगड्या उमेदवारांमुळे निकालाबाबत साऱ्यांनाच उत्सुकता!

हातकणंगले मतदारसंघात तगड्या उमेदवारांची संख्या अधिक असल्याने निकालाबाबत साऱ्यांनाच उत्सुकता आहे. शिंदेसेनेचे खासदार धैर्यशील माने, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, वंचितचे माजी जिल्हा परिषद सदस्य डी. सी. पाटील, शेतकरी नेते रघुनाथ पाटील यांच्यातील लढतीत कोण कोणाची किती मते खेचतात हे निकालाला कलाटणी देणारी ठरू शकते.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात यंदा उमेदवारीचे निश्चितीचे मानापमान नाट्य भलतेच ताणले गेले. महायुती मध्ये इच्छुकांची संख्या वाढल्याने पेच वाढला. त्यावर मात करीत खासदार धैर्यशील माने हे पुन्हा उमेदवारी मिळवण्यात यशस्वी ठरले. त्यानंतरही अपक्ष आमदारांचे नाराजीचे प्रकरण पुढे आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूरच्या दोन दौऱ्यांमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष विनय कोरे, इचलकरंजीचे ताराराणी पक्षाचे प्रकाश आवाडे आणि शिरोळचे शिंदेसेनेचेच राजेंद्र पाटील यड्रावकर या अपक्ष आमदारांची नाराजी दूर केली. आता तिघांनीही प्रचारामध्ये जोमाने उडी घेतली आहे.भाजप, शिंदे शिवसेना, अजितदादा राष्ट्रवादी यांचा संयुक्त प्रचार गतीने सुरू झाला आहे.

उमेदवाराच्या नाराजीचा मुद्दा पुसून काढून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यावर भर दिला जात आहे. धैर्यशील माने यांनी ८२०० कोटी रुपयांच्या कामांचा तपशील द्यायला सुरुवात केली आहे. या साऱ्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याचा फंडा वापरला गेला आहे. दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांना रसद पुरवून प्रचारात उतरवले गेले असल्याने त्याचाही फायदा होईल असे दिसत आहे.