‘शरद पवार पंतप्रधान असते, तर…’, राहुल गांधींनी पवारांना केले ‘सेफ’

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गौतम अदाणींवरून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना घेरले. पंतप्रधान नरेंद्र मोदी अदाणींना का वाचवत आहेत? असा प्रश्न राहुल गांधींनी नव्या प्रकरणावरून विचारला. यावेळी शरद पवार-गौतम अदाणी भेटीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला असता, राहुल गांधींनी स्पष्ट भूमिका मांडली. अदाणी प्रकरणात राहुल गांधींनी संयत उत्तर देत पवारांची सुटका केली, असं म्हटलं जात आहे.

राहुल गांधींची दिल्लीत पत्रकार परिषद झाली. ‘तुम्ही सातत्याने पंतप्रधानांना (नरेंद्र मोदी) प्रश्न विचारत आहात की, अदाणींमध्ये असं काय आहे की, त्यांची चौकशी केली जात नाहीये. शरद पवारांना तुम्ही कधी असा प्रश्न विचारला का की, अदाणींमध्ये असं काय आहे की पूर्ण इंडिया आघाडी अदाणी मुद्द्यावर एकजूट आहे. शरद पवार वारंवार अदाणींना भेटतात. यावर तुमचं म्हणणं काय आहे?’, असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला.

“…तर मी शरद पवारांनाही प्रश्न विचारला असता”

“नाही. मी त्यांना हा प्रश्न नाही विचारला. शरद पवार भारताचे पंतप्रधान नाहीत. शरद पवार अदाणींना वाचवण्याचं काम करत नाहीये. मोदी वाचवत आहेत. त्यामुळे मी मोदींना हा प्रश्न विचारतोय. जर शरद पवार भारताचे पंतप्रधान आणि ते जर अदाणींना वाचवत असते, तर मी त्यांनाही हा प्रश्न विचारला असता.”

राहुल गांधींनी अदाणींबद्दल कोणता मुद्दा काढला?

कोळशाच्या किमतीबाबत फायनान्शिअल टाईम्सचा अहवाल समोर आल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला. बुधवारी पत्रकार परिषदेत राहुल गांधी म्हणाले की, “उद्योगपती गौतम अदाणी यांनी कोळशाच्या चुकीच्या किमती दाखवून आणि खोटी बिले दाखवून विजेच्या दरात वाढ केली आहे. अदाणीने थेट तुमच्या (जनतेच्या) खिशातून 12 हजार कोटी रुपये घेतले आहेत.”

‘”पंतप्रधान अदाणींना वाचवत आहेत’

पत्रकार परिषदेत काँग्रेस नेते म्हणाले की, “गरीब लोक जेव्हा पंखा चालवतात किंवा बल्ब लावतात तेव्हा पैसे थेट अदाणींच्या खिशात जातात. अदाणीला भारताचे पंतप्रधान वाचवत आहेत. लोकांनी कोणताही स्विच दाबताच त्यांचे पैसे थेट अदाणींच्या खिशात जातात. गौतम अदाणी हे कोळशाच्या खरेदी-विक्रीमध्ये ओव्हर इनव्हॉइसिंग करत आहेत”, असा आरोप राहुल गांधींनी केला.

राहुल गांधींचा अदाणींवर आरोप, “हे वीजचोरीचे प्रकरण”

विदेशी वृत्तपत्र फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्ताचा हवाला देत राहुल गांधी म्हणाले की, “हे थेट वीजचोरीचे प्रकरण आहे. अदाणींमध्ये असं काय आहे की, भारत सरकार त्यांची कोणतीही चौकशी करू शकत नाही. कोणतेही प्रश्न विचारू शकत नाही. यामागे कोणती शक्ती आहे हे संपूर्ण देशाला माहीत आहे”, असं राहुल गांधी म्हणाले.