धैर्यशील माने व सत्यजीत पाटलांसाठी लोकसभा निवडणुकीत साखर कारखानदार १०० कोटींचा डाव खेळत आहेत. शेतकरी चळवळ संपविण्यासाठी या दोघांच्या खांद्यावर बंदूक ठेवून साखर कारखानदारांनी कटकारस्थान रचले आहे, असा गंभीर आरोप स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला.ते बिळाशी( ता. शिराळा )येथील जाहीर सभेत बोलत होते.
शेतकरी चळवळ ही कष्टकऱ्यांच्यासाठी उभी केली आहे. कितीही वार झाले तरी मी झेलायला समर्थ आहे, असेही शेट्टी म्हणाले.हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये यावेळी पंचरंगी सामना होत आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने राजू शेट्टी हे तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहे.तर त्यांच्या विरोधात महायुतीचे विद्यमान खासदार धैर्यशील माने , महाविकास आघाडीचे ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील ,शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ दादा पाटील आदी प्रमुख उमेदवार आहेत.
या मतदारसंघांमध्ये साखर कारखानदारांची संख्या अधिक असल्याने आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांची नेतेही अधिक असल्याने निवडणुकीला साखर कारखानदार विरुद्ध ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नेते असे वळण लागले आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी केलेला हा आरोप चर्चेला कारण ठरला आहे.