इस्लामपूर शहरातील आठवडी बाजाराबरोबर रोजच भरणारी भाजीमंडई बहे रस्त्यावर भरते. त्यामुळे वाहतूककोंडी नित्याचीच झाली आहे. विशेषतः दुर्गा कॉर्नरला दोन्ही बाजूंना काही भाजी व फळ विक्रेते बसतात. त्यामुळे दुर्गा कॉर्नर अपघाताला निमंत्रण देणारा ठरत आहे. हे विक्रेते पोलिसांनाही जुमानत नाहीत. इस्लामपुरात बहे रस्त्यावर असलेल्या दुर्गा कॉर्नरवरच भाजी, फळ विक्रेते अपघाताला कारणीभूत ठरत आहेत.
दुर्गा कॉर्नर, वाळवा बझार, अजिंक्य बझार आदी ठिकाणी चारचाकी व दुचाकी बेकायदेशीरपणे पार्किंग केले जाते. त्यामुळे ही वाहतूककोंडी नित्याचीच ठरते. यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी रविवारी आणि गुरुवारी जड वाहनांना बहे रस्त्यावरून बंदी घातली आहे. मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या काही मंत्र्यांनी तसेच महाविकास आघाडीनेही शहरातील भाजी मार्केटचे सुपर मार्केट करण्याचे आश्वासन दिले आहे. इस्लामपुरातील ‘शासन आले आपल्या दारी’ या कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुपर भाजी मार्केटचे भूमिपूजनही केले.
यापूर्वी महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांनी याची घोषणाही केली होती. परंतु, त्याला अद्याप मुहूर्त लागला नाही. रोजच्या भाजीमंडईमध्ये गर्दी आणि बसणाच्या विक्रेत्यांमुळे कोंडी ही होतेच. हा रस्ता जड वाहनांसाठी कायमचा बंद करावा, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे.