महाविकास आघाडीच्या जागावाटपामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघ शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेला. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळं काँग्रेसमधून लोकसभा निवडणुकीसाठी तयारी करणाऱ्या विशाल पाटील यांनी वेगळा निर्णय घेतला.
काँग्रेसला ही जागा न सुटल्यानं विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज जाहीर करण्याचा निर्णय घेत निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली. आता सांगलीची लढत तिरंगी होत आहे. विशाल पाटील यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवण्याच्या निर्णयावर ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतल्यानं काँग्रेस पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. विशाल पाटील हे सांगलीतील काँग्रेसचे प्रमुख नेते असून प्रदेश उपाध्यक्ष आहेत.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही सांगलीची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेली. यामुळं विशाल पाटील यांोनी उमेदवारी अर्ज मागं घ्यावा यासाठी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी प्रयत्न केले होते. काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेतृत्त्वाला विशाल पाटील यांची समजूत काढण्यात अपयश आलं. त्यामुळं उमेदवारी अर्ज कायम ठेवत निवडणूक लढवणाऱ्या विशाल पाटील यांच्यावर पक्षाकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.