इचलकरंजीला पाणी देणार नाही तोपर्यंत…….

इचलकरंजी शहरात पाण्याची तीव्र पाणी टंचाई जाणवते. पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सद्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांची शहापूर-इचलकरंजी येथील जाहीर सभा झाली. शहरास कोणत्याही परिस्थिती मीच पाणी देणार,’ अशी ग्वाही स्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली.

शहापूर येथील स्वामी अपार्टमेंट ते शहापूर बसस्थानकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. ‘इचलकरंजी शहरास पाणी देणार ही माझी गॅरंटी आहे. शहरास पाणी हे कसे द्यायचे ते मी बघेन. तुम्ही फक्त मला साथ द्या,’ असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. शेट्टी म्हणाले, ‘गतवेळच्या निवडणुकीत पाण्यासाठी कारण नसताना माझा बळी घेण्यात आला. तरीही पाण्याचा प्रश्न त्यांना सोडविता आला नाही.

इचलकरंजी शहराला कोणत्याही परिस्थिती शुध्द व मुबलक पाणी मिळायला पाहिजे, ही माझी पहिल्यापासूनची ठाम भूमिका आहे व ते संघर्ष करूनच मिळवावे लागेल. वारणा पाणी योजनेला मी कधीही विरोध केला नाही. माझे नाव पुढे करून त्यावेळी माझी नाहक बदनामी करणे हा व्यापक कटाचा भाग होता. सुळकूड व वारणा पाणी योजनेला विरोध करणारे हे माझे विरोधक आहेत.

इचलकरंजीच्या स्थानिक नेत्यांची वारंवार बदलणारी भूमिका ही शहरास पाणी मिळण्यास अडथळे निर्माण होत आहेत. निवडणूक आचारसंहिता संपल्यावर माझे पहिले काम शहरासाठी पाणी लढ्यासाठी चळवळ उभी करणे हेच आहे. शहराला पाणी मिळण्यासाठी मी कोणत्याही स्तरावर जायला तयार आहे. यासाठी इचलकरंजी शहरातील लोकांची मला साथ हवी.

यंत्रमागधारकांच्या न्याय मागण्यासाठी लढा उभारून शासनस्तरावर त्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.’