कॅफे फोडणाऱ्या सोळा जणांवर गुन्हा दाखल!

अश्लील प्रकार सुरूअसल्याचा आरोप करीत सांगलीतील विश्रामबाग परिसरातील हँग ऑन, डेनिस्को आणि सनशाईन कॉफी शॉपमध्ये घुसून दगडाने आणि काठीने तोडफोड केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानच्या १६ कार्यकर्त्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत कॉफी शॉप मालक आशुतोष घाडगे (रा. रामकृष्ण परमहंस सोसायटी) याने विश्रामबाग पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे. संशयित रणजित चंदन चव्हाण, रोहित रामचंद्र मोरे, करण महालिंग म्हेत्रे, विक्रांत विठ्ठल कोळी, विनायक बसाप्पा आवटी, शंकर नागराज वडर, संदीप अशोक जाधव, अर्जुन ईश्वर जगे, अविनाश पोपट भोसले, प्रथमेश अशोक सूर्यवंशी, योगेश बाळू गुरखा, मारुती गोविंद घुटुगडे, विलास गोपाळ पवार, सागर अनिल सूर्यवंशी, प्रदीप अधिकराव पाटील, दिगंबर मनोहर साळुंखे (रा. सांगली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

संशयितांनी नेमीनाथनगर क्रीडांगणावर एकत्र येऊन अवैध व अश्लील कृत्ये चालणाऱ्या कॉफी शॉपमध्ये घुसून साहित्याची तोडफोड व नुकसान करण्याचा कट रचला. त्यानंतर दुपारी १२ वाजता हँग ऑन तसेच खरे मंगल कार्यालयाजवळील डेनिस्को, सनशाईन कॉफी शॉपमध्ये घुसून तोडफोड केली. यामध्ये सुमारे साडेसहा लाखांचे नुकसान झाले असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. त्यानुसार १६ जणांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी सहायक निरीक्षक तानाजी कुंभार तपास करत आहेत.