सांगलीत भाजपला आणि संजय राऊतांना एकाचवेळी हादरा!

सांगली लोकसभेला भाजप खासदार संजय पाटील यांच्या समोरील अडचणी वाढताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय पाटील यांच्या उमेदवारी विरोधात रोष समोर येत असतानाच आता माजी आमदार विलासराव जगताप यांनी पक्षालाच रामराम केला आहे. त्यामुळे भाजपला सांगलीमध्ये तगडा हादरा बसला आहे.

जतचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देताना थेट काँग्रेसच्या विशाल पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीन दिवस सांगली दौरा करताना विलासराव जगताप यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये संजय राऊत यांनी ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती.

मात्र, विलासराव जगताप यांनी भाजपचा राजीनामा देत चंद्रहार पाटील यांना पाठिंबा न देता विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्याने संजय राऊत यांना सुद्धा झटका बसला आहे. दरम्यान, सांगलीमधील भाजपची नाराजी समोर येण्याची ही पहिलीच घटना नसून यापूर्वी सुद्धा माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनीही खडे बोल सुनावले होते.