लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सर्व नेत्यांमध्ये चढाओढ सुरु आहेच. आपापल्या परीने ते गावोगावी सभांचे आयोजन करीत आहेत. विटा येथे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी प्रचार रॅली काढली. यावेळी त्यांनी संजय पाटील यांच्यावर टीका केली. उसाची बिले न देता शेतकऱ्यांना देशोधडीला लावत जमिनी बळकावण्याचे काम करणारे खासदार संजय पाटील हे सांगली जिल्ह्याचे भस्मासुर आहेत, अशी टीका महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी केली.
यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यावरही टीकेची झोड उठविली. मी शेतकऱ्यांचा मुलगा असलेला उमेदवार असून या दोघांशी माझी बरोबरी होऊच शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. चंद्रहार पाटील म्हणाले, तासगाव, नागेवाडी साखर कारखाना ही दोन सहकाराची मंदिरे हडप करण्याचे पाप खासदारांनी केले. दुसरे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे राजकारण आजोबांचे नाव घेतल्याशिवाय सुरू होत नाही. त्यांनीही वसंतदादा कारखाना बुडविला. त्यामुळे या दोघांना माझ्यावर टीका करण्यासाठी कोणताच मुद्दा नाही. माझ्यासारख्या एका शेतकऱ्याच्या मुलाने त्यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.