काही दिवसांपासून सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रातून पुरवठा होणाऱ्या पाण्याला फिकट पिवळसर रंग येत असल्याने या पाण्याची तसेच उजनी धरणातील, टाकळी इंटकवेल, जलशुद्धीकरण केंद्र, कंझ्युमर एंड व मलनिस्सारण केंद्र (एसटीपी) येथील पाण्याचे नमुने गुणवत्ता तपासण्यासाठी नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन (एनईईआरआय) या संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत.
संस्थेचा अहवाल आल्यानंतर पाण्याची प्रत्यक्षात गुणवत्ता समजणार आहे. उजनी धरणात अत्यल्प पाणीसाठा असल्याने व यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने त्यामध्ये शेवाळचे प्रमाण खूप आहे.
सोलापूर शहरासाठी १० ते १२ मार्च रोजी पुढील आवर्तन सोडण्यात येणार असल्याने पाण्याची गुणवत्ता आणखी खालावण्याची शक्यता नाकारता येत नाही. खबरदारी म्हणून २ व ३ मार्च रोजी उजनी धरणातील, टाकळी इंटेकवेल, जलशुद्धीकरण केंद्र, कंझ्युमर एंड व एसटीपी यासर्व ठिकाणचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी एनईईआरआय या संस्थेकडे पाठविण्यात आले आहेत.
एनईईआरआय येथील शास्त्रज्ञांनी सर्व ठिकाणच्या पाणी तपासून सोलापूर शहरास होणारा पाणी पिण्यायोग्य असल्याचे प्राथमिकदृष्ट्या सांगितले आहे. नागरिकांनी पाणी हे उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन केले आहे.