कुरळपला डेंग्यूच्या रुग्णांत वाढ….

वाळवा तालुक्यातील कुरळप गावात २५ ते ३० जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. सध्या १० नवीन रुग्ण आढळले आहेत. कुरळप येथील हनुमान यात्रा पार पडली. मागील दोन चार दिवसापासून गावात डेंग्यूच्या रुग्णात वाढ होत आहे. काही रुग्ण कोल्हापूर, इस्लामपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत तर काहींच्यावर गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र व खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तातडीने डेंग्यू व जंतू नाशकाची फवारणी करण्याची नागरिकांतून मागणी होत आहे. सध्या उन्हाचा पारा वाढल्याने उष्णतेने नागरिकांच्या जीवाची घालमेल होत आहे यामुळे नागरिक रात्रीच्यावेळी घराच्या अंगणात बसतात, याचवेळी हे डेंग्यूचे डास चावल्याने रुग्णांत वाढ होताना दिसत आहे तर, गावातील हनुमान मंदिरासमोरील पाटील गल्लीत जास्त प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत.