सांगली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्याची मागणी होत असताना शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या जागेवर चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली. यानंतर काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी करत बंडखोरी केली. याकडे लक्ष वेधले असता शरद पवार यांनी या जागेबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये कोणतीच चर्चा झाली नसल्याचे सांगितले.जिथे ज्यांचे उमेदवार निवडूण येऊ शकतात अशा जागांवर दुसऱ्याने आग्रह न करता ती जागा जिंकू शकणाऱ्या पक्षाला द्यायची असे महाविकास आघाडीत ठरले होते.
राज्यातील सर्वच जागांवर अशा पध्दतीने उमेदवार ठरवण्यात आले. मात्र, सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवार ठरवताना कोणतीच चर्चा केली नाही. तेथील उमेदवारी आम्हाला थेट टीव्हीवरील बातम्यांमधूनच कळाली, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादीचे अध्यक्ष माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केला. ते म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरवताना कुणी जास्त जागा मागायच्या नाहीत असे ठरले होते. कोणत्या पक्षाचा उमेदवार तेथे निवडून येऊ शकतो ती जागा त्या पक्षाला द्यायची या सुत्रानुसार उमेदवार निश्चित करण्यात आले.
मात्र, याला सांगली लोकसभा मतदारसंघ अपवाद ठरला. येथील उमेदवारी आम्हाला थेट टीव्हीवरुनच कळाली. कोण उमेदवार आहे हेही टीव्हीवरुनच समजला. पण, एकदा निर्णय घेतला आहे म्हंटल्यावर आम्ही या निर्णयाच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत.