या दिवसापासून जाणार एसटी कर्मचारी पुन्हा संपावर….

राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा 9 ऑगस्टपासून संपावर जाणार आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी एसटी कर्मचारी यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनात राज्यभरातील 13 एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटना सहभागी होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्यातील लालपरीचे चाकं थांबण्याची शक्यता आहे.

राज्य परिवहन कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी यासाठी बेमुदत उपोषणाचा इशारासुद्धा देण्यात आला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ता, वेतनवाढ देण्याचं करारानुसार मान्य केलं आहे. पण मागण्यांची पुर्तता करण्याबद्दल पाठपुरावा केल्यानंतरही त्यावर कार्यवाही केली जात नसल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे.

मूळ वेतनात विसंगती असून इतर महामंडळांच्या तुलनेत एसटी कामगारांचे वेतन कमी आहे. त्यामुळे सर्व कामगारांना सरसकट मूळ वेतनात ५ हजार रुपयांची वाढ लागू करावी अशी मागणीही करण्यात आलीय. आयुर्मान संपलेल्या बसेस चालनातून काढून घ्याव्या आणि नव्या बसेस उपलब्ध करून द्यावा, मनुष्यबळही पुरेसे नसल्याने सध्या कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर ताण येत असल्याचं महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने म्हटलं आहे.