विठुरायाचे पदस्पर्श दर्शन लांबणीवर!

पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर जतन आणि संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले होते. हे काम या महिन्यात पूर्ण होणार (Pandharpur) अशी अपेक्षा होती. मात्र सदरचे काम रखडल्याने विठुरायाचे पदस्पर्श दर्शन लांबणीवर पडले आहे.यामुळे भाविकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.पंढरपूरच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धार आणि संवर्धनाचे काम वेगाने सुरू आहे.

विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिराला पुरातन मूळ रूप देण्यासाठी राज्य सरकारने ७४ कोटी रुपयांचा मंदिर विकास आराखडा मंजूर केला आहे. त्यानुसार हे काम पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली (vitthal Rukmini Mandir) करण्यात येत आहे. यामुळे १५ मार्चपासून विठुरायाचे पदस्पर्श दर्शन बंद करण्यात आलं आहे.मंदिर समितीने १ मे पर्यंत काम पूर्ण करून पदस्पर्श दर्शन सुरू करण्याची तयारी केली होती. पण ठेकेदाराला दिलेली ४५ दिवसांची मुदत संपून गेली आहे.

तरी काम अद्याप संथ गतीने सुरू आहे. यामुळे भाविकांमध्ये नाराजी पसरलेली आहे. चरणस्पर्श दर्शन बंद असल्याने या काळात देवाचे पहाटे सहा ते सकाळी ११ वाजेपर्यंत मुख दर्शन सुरू आहे. त्यामुळे देवाचे पदस्पर्श दर्शन कधी सुरू होणार याकडेच भाविकांचे लक्ष लागले आहे. वेळेत काम पूर्ण करावे अशी मागणी भाविकांनी केली आहे.