वडगाव नगरपरिषदेने केली आदर्श मतदान केंद्राची उभारणी!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग व राज्य निवडणूक आयोग यांच्या सुचनेनुसार स्वच्छ सर्वेक्षण व माझी वसुंधरा अभियान तसेच वेस्ट टू वंडर या संकल्पनेवर आधारित वडगाव नगरपरिषद वडगाव यांच्या वतीने आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते.या संकल्पनेची अंमलबजावणी वडगाव नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुमित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार केंद्र क्रमांक ६२ते ६७ शारदा विद्या मंदिर पेठ वडगाव येथे हे आदर्श मतदान केंद्र उभारण्यात आले होते. भुमी-वायु-जल-अग्नी व आकाश या पंचतत्त्वांच्या संवर्धन करण्याबाबत तसेच वातावरणीय बदल व पर्यावरण सुधारण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती या माध्यमातून करण्यात आली.

तसेच प्लास्टिक बंदी, कचरा वर्गीकरण, घरगुती खत निर्मिती याबाबत सुद्धा स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत जनजागृती करण्यात आली.वेस्ट टू वंडर या संकल्पनेवर आधारित सेल्फी पॉईंट उभारण्यात होते. टायर पासून खुर्ची तसेच गाडी लोखंडापासून बसण्यासाठी बेंच असे सेल्फी पॉइंट उभारण्यात आले होते. टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंचा जास्तीत जास्त वापर करा ,कागदी कापडी व जूटचा पिशव्यांचा वापर करा, वर्गीकृत कचरा घंटागाडीत टाका, ओल्या कचऱ्यापासून घरीच खत निर्मिती करा ,आपले घर व परिसर स्वच्छ ठेवा असे जनजागृती संदेश या मतदान केंद्राच्या माध्यमातून देण्यात आले.मतदान करून जास्तीत जास्त नागरिकांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी व्हावं असे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्या वतीने या आदर्श मतदान केंद्राच्या माध्यमातून करण्यात आले होते.