इचलकरंजी आगाराची बस सेवा अखंडितपणे सुरू राहावी. तसेच मुक्कामी बससेवा पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी खोचीसह परिसरातून होत आहे.येथील भैरवनाथांची यात्रा एप्रिलमध्ये तीन टप्प्यांत होत आहे. या पार्श्वभूमीवर भक्तगण व यात्रेकरूंसाठी बस फेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे.
खोची-पेठवडगाव अशी फेऱ्या करणारी कोल्हापूर आगारातून बस सोडण्यात येत होती; परंतु अपुरी बस संख्या, चालक, वाहकांची कमतरता तर प्रासंगिक करार, यात्रा-जत्रा यामुळे कोल्हापूर आगारातून बस सेवा किंवा काही फेऱ्या रद्द केल्या जात होत्या.
यासाठी कमी उत्पन्नाचे कारण दिले जात होते. बस फेरी अचानक रद्द केल्यामुळे प्रवासी, विद्यार्थी आणि महिलांचे हाल होत होते. या विरोधात प्रवाशांनी अनेक वेळा आंदोलन केले. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून ग्रामपंचायतीतर्फे निवेदन दिले.
अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क करून बस सेवा नियमित करण्याची मागणी वेळोवेळी केली.मागील काही महिन्यांपासून यावर उपाय म्हणून एसटीच्या इचलकरंजी आगारातून पेठवडगाव-खोची अशी बससेवा सुरू केली. त्यामुळे रात्री मुक्काम आणि दिवसभरात पेठवडगाव ते खोची अशा तेरा फेऱ्या होत आहेत.
बस फेऱ्या वाढल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढली. या बससेवेचा विद्यार्थी आणि महिलांना मोठा फायदा होत आहे; परंतु एक एप्रिलपासून अचानकपणे इचलकरंजी आगाराची बस सेवा बंद करून पुन्हा कोल्हापूर आगारातून बस सेवा देण्याचा सुरू करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.
यामुळे सुरळीत झालेली बस सेवा पुन्हा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडणार आहे. त्यामुळे महिला, विद्यार्थ्यांना पुन्हा खासगी वाहतुकीचा आधार घ्यावा लागणार आहे. त्यामुळे इचलकरंजी आगारातून बस सेवा कायमपणे सुरू राहण्याची मागणी प्रवासी, विद्यार्थी आणि महिलांतून होत आहे.