मिरजेतील ‘आम्ही शिवभक्त’ संघटनेच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवरायांचा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत उंच म्हणजेच तब्बल २८ फुटी अश्वारूढ पुतळा आणण्यात आला आहे. गुरुवार, ९ मे रोजी मिरजेत या भव्य पुतळ्याची मिरवणूक काढण्यात येणार आहे. प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मिरजेत शिवजयंती उत्सवाचे आयोजन केले आहे. यंदाच्या शिवजयंतीत २८ फुट उंच शिवरायांचा पुतळा आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील वाघोली येथून हा पुतळा आणण्यात आला आहे.
पाच दिवसांपूर्वी मिरजेत हा पुतळा दाखल झाला. गुरुवारी भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी पाच वाजता गुजरातमधील सानंदचे आमदार कनुभाई पटेल यांच्या हस्ते पुतळ्याचे पूजन होणार आहे. त्यानंतर साडेपाच वाजता नदीवेस कोळीवाडा येथून मिरवणुकीस सुरुवात होईल. शहरातील प्रमुख मार्गांवरून ही मिरवणूक काढण्यात येणार असून, रात्री दहा वाजता शिवतीर्थ येथे मिरवणुकीची सांगता होईल. त्या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. संपूर्ण पुतळा फायबरपासून बनविला असून, लोखंडी अँगलही आहेत. अश्वारुढ पुतळा अत्यंत देखणा व भव्य असल्याने तो पाहण्यासाठी आतापासून गर्दी होत आहे.