अलीकडे उन्हाची तीव्रता खूपच वाढत आहे अशातच अनेक गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे. सध्या दुष्काळी भागामध्ये तापमान वाढीचा त्रास मोठ्या प्रमाणात जाणवू लागला असून तापमानाचा पारा ४२ च्या वर जाऊ लागला आहे. उन्हाची लाही असतानाच आटपाडी तालुक्यामध्ये खुलेआम वृक्षांची कत्तल करण्याचा प्रकार सुरू झाला आहे. आटपाडी तालुक्यामधून पंढरपूर क-हाड, दिघंची-हेरवाड, यासह अन्य महामार्ग जातात.
महामार्ग निर्माण होत असताना दोन्ही बाजूस असणाऱ्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आली होती. यावेळी महामार्ग बनवणाऱ्या ठेकेदाराने महामार्गाच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण केले होते. परिणामी अधीच वृक्षांची कत्तल झाली होतीच. त्याचवेळी रस्त्याच्या दोन्ही भागामध्ये असणारे मोठमोठे वृक्ष तसेच होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून, आटपाडी, शेटफळे, करगणी या भागामध्ये व रस्त्याच्या कडेला असणारी मोठी झाडे तोडण्यात येत आहेत.यामध्ये प्रथम झाडाच्या बुंध्याला आग लावण्यात येते. या आगीने वृक्ष वाळला जातो किंवा उन्मळून पडला जातो.
मग वृक्ष उन्मळून पडल्यानंतर त्यावर सोपस्कारपणे कुम्हाड चालवली जाते. दरम्यान वृक्ष कत्तलीसाठी एक मोठी साखळी कार्यरत असून महामार्गावरील मोठी झाडे तोडताना ती त्या मालकास आगोदर जाळण्यास सांगितले जाते. मगच ती तोडली जातात. यामध्ये मोठ्या प्रमाणात वन अधिकारी यांची मिलीभगत असल्याचे बोलले जात आहे. आटपाडी शहरापासूनच काही अंतरावर मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जात आहेत. याकडे आटपाडीच्या वन विभागाच्या अधिकारी वर्गाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे.