विधानसभेपासून राजकारणात सक्रिय, शिंदेसेनेच्या युवा नेत्याची आटपाडी नगरपंचायतसाठी चाचपणी…..

लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलल्याचे चित्र सर्वानीच पहिले. अनेक पक्षप्रवेश देखील झाले. आता आगामी नगरपंचायतीचे वेध अनेकांना लागलेले आहेत. इच्छुकांविधानसभेपासूनच राजकारणात सक्रिय झाले आहेत. आटपाडीला नगरपंचायत स्थापन होऊन दोन वर्षे होऊन गेली आहेत. अद्याप निवडणूक लागलीच नाही. सध्यातरी मुख्याधिकारी यांच्याकडेच शहराचा गाडा आहे. तर निवडणुका कधी लागतील याबाबत कोणत्याच हालचाली नसल्या तरी इच्छुकांनी आतापासूनच पेरणी करण्यास सुरुवात केली आहे.

भाजप, शिवसेना या दोनच पक्षांमध्ये नगराध्यक्षपदासाठी मुख्य लढत होण्याची चिन्हे आहेत. यामध्ये शिवसेनेकडून माजी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय पाटील यांचे नाव नगरपंचायत स्थापन झाल्यापासून चर्चेत आहे. मात्र, झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून पृथ्वीराज पाटील हे मोठ्या प्रमाणात राजकीय पटलावर सक्रिय झाले आहेत तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांचे सुपुत्र दिग्विजय देशमुख यांनीही गेल्या वर्षांपासून शहरात सक्रिय होत निवडणुकीमध्ये उतरण्याची तयारी केली आहे.

मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये राजेंद्रअण्णा देशमुख यांचा झालेला पराभव व शहरात त्यांना मिळालेली मते विचारात घेता नगराध्यक्षपदासाठी खूपच संघर्ष करावा लागणार आहे. तर भाजपचे जत विधानसभेचे आमदार गोपीचंद पडळकर गटाकडून अनेक इच्छुक असून विनायक पाटील, चंद्रकांत दौंडे व अन्य नावे चर्चेत आहेत.

 आटपाडी तालुक्याच्या राजकीय पटलावर शिंदेसेनेचे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील यांचे चिरंजीव पृथ्वीराज पाटील नव्या दमाचा चेहरा म्हणून चर्चेत येत आहेत. येणाऱ्या आटपाडी नगरपंचयात निवडणुकीसाठी त्यांनी चाचपणी केली असून अनेक इच्छुकांची यामुळे धास्ती घेतली आहे. इच्छुकांनी अनेक वर्षे तयारी करून पुन्हा ती वाया जाणार की काय? असा प्रश्न सध्या त्यांच्या समोर उभा ठाकला आहे. सध्यातरी पृथ्वीराज पाटील यांच्या राजकीय प्रवेशाने आटपाडी शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

अद्याप आटपाडी नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर नाहीत. मात्र, तरीही आटपाडी शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. प्रत्यक्षात नगर पंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्यावर अनेक धक्कादायक घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून अनेक इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे.