आजपासून कासेगावमध्ये राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार!

कासेगाव (ता. वाळवा) येथील क्रांतिसिंह नाना पाटील व्यायाम मंडळाच्यावतीने शारदा रामचंद्र पाटील यांच्या स्मरणार्थ राज्यातील १६ अव्वल दर्जाच्या निमंत्रित संघांच्या मॅटवरील राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा थरार शुक्रवारपासून (दि. १०) रंगणार आहे. कासेगाव येथे क्रांतिसिंह नाना पाटील व्यायाम मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेची तयारी सुरु आहे.

मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संजय पाटील, क्रीडा मार्गदर्शक ज्ञानदेव पाटील यांनी ही माहिती दिली. डॉ. पाटील म्हणाले, शासकीय विश्रामगृह रस्त्यावरील होमसाहेब क्रीडानगरीत ३ दिवस या स्पर्धा सायंकाळी ५ ते १० या वेळेत होतील.

स्पर्धेतील पहिल्या चार विजेत्यांना ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये व चषक असे पारितोषिक देण्यात येणार आहे. दोन उत्कृष्ट खेळाडूंसाठी प्रत्येकी १० हजार रुपये बक्षीस आहे. स्पर्धेतील सर्व सहभागी संघांना हमखास बक्षीस देणारी ही राज्यातील पहिली स्पर्धा ठरली आहे.