आष्टा शहरातील अनेक युवक सायकलींवरून नियमितपणे सुमारे पंधरा ते वीस किलोमीटर व्यायाम करतात. या सायकलप्रेमी युवकांपैकी अमोल पाटील, अमोल चौगुले, प्रकाश उर्फ छोटू लिगाडे, परशुराम मदने, लक्ष्मण माळी, सचिन चौगुले, शुभम सरडे, संदीप खोत (मिरजवाडी), सुबोध वाळवेकर, बाहुबली चौगुले (भिलवडी), सुहास सूर्यवंशी (पलूस), महावीर वसगडेकर (मिरज), जितेंद्र शेट्टी (अंकली), दीपक पाटील, सुहास सूर्यवंशी यांनी भिलवडी-आष्टा ते कन्याकुमारी असा सायकलवरून प्रवास करण्याचे निश्चित केले. त्यांना उद्योगपती गिरीश चितळे, राजू चौगुले, अमोल पाटील, डॉ. अरुण सरडे, निनाद माळी यांचे सहकार्य लाभले.
वाळवा तालुक्यातील आष्टा येथील युवकांनी भिलवडी-आष्टा ते कन्याकुमारी सायकलवरून प्रवास सुरू केला आहे. सुमारे १४ युवक १४०० किलोमीटर सायकलवरून प्रवास करीत शांतता, व्यसनमुक्ती तसेच बेटी पढाओ बेटी बचाओ तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे, निसर्गाचा समतोल राखण्याचा संदेश देत आहेत.डॉ अरुण सरडे यांनी वयाच्या साठीनंतरही सायकल प्रवास सुरू ठेवला असून, त्यांनी नुकताच सप्टेंबरमध्ये जम्मू ते कन्याकुमारी असा प्रवास करीत आदर्श घालून दिला आहे.