२६ जानेवारी प्रजाकसत्ताक दिन संपूर्ण देशभर अगदी उत्साहाने आणि आंनदाने साजरा केला जातो. ठिकठिकाणी झेंडा वंदन कार्यक्रम आयोजित केले जातात. वाळवा तालुक्यातील कामेरी गावचे लोकनियुक्त सरपंच रणजित पाटील यांना २६ जानेवारी रोजी प्रजाकसत्ताक दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी शासनाकडून विशेष निमंत्रीत करण्यात आले आहे. राज्यातील ८ सरपंचांना हा सन्मान मिळाला आहे. त्यात रणजित पाटील यांचा समावेश आहे. राज्यातील जी गावे हर घर जल प्रमाणित झाली असून त्या गावांमधील पाणी पुरवठा योजना ग्रामस्थांना हस्तांतरीत करण्यात आल्या आहेत. तसेच या योजना ग्रामपंचायत पाणी समितीमार्फत सक्षमपणे चालविल्या जात आहेत.
अशा पाणी पुरवठा समितीमधील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांमधून राज्यातील ८ सरपंचांना या सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे. प्रजाकसत्ताक दिनी कर्तव्यपथ येथे पार पडणाऱ्या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्याचा मान या सरपंचांना मिळणार आहे. सिंधुदुर्ग, नंदुरबार, अकोला, चंद्रपूर, धुळे, अमरावती, गोंदिया या जिल्ह्यातील सरोंचांचा यामध्ये समावेश आहे. सांगली जिल्ह्यातून रणजीत पाटील यांची एकमेव निवड झाली आहे. निवड झालेले सरपंच व सोबत एका व्यक्तीचा दिल्लीपर्यंतचा प्रवास, राहणे व जेवणाचा खर्चही शासन करणार आहे.