आजपासून बहे येथे भैरवनाथ यात्रेस सुरुवात

बहे (ता. वाळवा) येथील भैरवनाथ देवाची यात्रा आज शुक्रवार (दि. १०) पासून सुरू होत आहे. ही यात्रा दोन दिवस चालणार असून, या यात्रेच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत यात्रेच्या कालावधीमध्ये ध्वनियंत्रणेला फाटा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

श्री भैरवनाथ यात्रेच्या नियोजनासाठी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सरपंच संतोष दमामे, उपसरपंच अधिक मोहिते, सर्व ग्रामपंचायत सदस्य, यात्रा समिती सदस्य व ग्रामस्थ यांच्यात झालेल्या बैठकीत ध्वनिप्रदूषणाला फाटा देत यात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. आज, शुक्रवारी दुपारी चार वाजता गावाच्या प्रमुख मार्गावरून पारंपरिक वाद्यांच्या निनादात, तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी निघेल.

श्रींच्या जयघोषात पालखीची गावातून मिरवणूक झाल्यावर पुन्हा पालखीचे मंदिरात प्रस्थान होईल. भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.यात्रेच्या कालावधीत ध्वनियंत्रणेला फाटा देण्याच्या निर्णयाचे सर्वत्र कौतूक होत आहे. बहे येथील भैरवनाथ मंदिराची रंगरंगोटी केली आहे.