कोल्हापूरातील टोकाचे विरोधक तब्बल 9 वर्षांनी आले एकत्र

जिल्ह्याच्या राजकारणात एकमेकांचे टोकाचे विरोधक असलेले खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील काल (शनिवार) एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आले खरे, पण त्यांच्यात संभाषण तर दूरच पण नजरानजरही झाली नाही.

निमित्त होतं कृषी विभागाच्या वसतिगृहाच्या उद्घाटनाचे आणि या दोघांना एकत्र आणले ते पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या या कार्यक्रमाच्या उपस्थितीमुळे. प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या (रामेती) विद्यार्थी वसतिगृहाचे उद्घाटन काल झाले.

पालकमंत्री हसन मुश्रीफ या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते, तर निमंत्रितांच्या यादीत सर्व लोकप्रतिनिधींसह खासदार महाडिक व आमदार पाटील यांचीही नावे होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सतेज पाटील हे प्रवेशद्वारावरच मंत्री मुश्रीफ यांच्या प्रतीक्षेत थांबले तर आत धनंजय महाडिक हेही मुश्रीफ यांची वाट बघत होते.

मुश्रीफ येताच पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. या दोघांनाही घेऊन मुश्रीफ यांनी एकत्र फेटे बांधले. त्यावेळी मुश्रीफ यांच्या उजव्या बाजूला महाडिक तर डाव्या बाजूला पाटील बसले. नऊ वर्षानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने हे दोघे एकत्र आले. पण, त्यांच्यात संभाषण तर नाहीच पण नजरानजरही झाली नाही. माध्यमांच्या प्रतिनिधींना बघताच मात्र दोघांच्याही चेहऱ्यावर हसरे भाव दिसले. दोघांच्या या भेटीचीच चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात दिवसभर सुरू होती.

विकासासाठी दोघांचेही सहकार्य घेणार-मुश्रीफ

यापुढे मी ज्या ज्या ठिकाणी कार्यक्रमाला असेल त्याठिकाणी खासदार धनंजय महाडिक व आमदार सतेज पाटील हे दोघे एकत्र असतील असे सांगतानाच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी या दोघांना सोबत घेणार असल्याचे सांगितले. लोकसभेच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या उमेदवारांना माझ्या शुभेच्छा असतील. पण, महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी करण्यासाठी मी जिवाचे रान करणार असल्याचे मुश्रीफ म्हणाले.

फेसबुकवर उपस्थितीचा उल्लेख

या कार्यक्रमाची फोटोसह बातमी सतेज पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाउंटवर शेअर केली आहे. त्यात खासदार महाडिक यांच्या उपस्थितीचा उल्लेख केला आहे. यापूर्वी भाषणात त्यांचे नावही न घेणाऱ्या पाटील यांनी त्यांच्या नावाचा केलेला उल्लेखही चर्चेचा विषय ठरला आहे.