रस्त्यावर उभे राहण्याच्या किरकोळ कारणावरून भोई गल्लीतील दोन गटांत जोरदार हाणामारी व दगडफेकीचा प्रकार गुरुवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडला.मारहाणीत सचिन संभाजी मोरे (वय ४४), नीलेश नंदकुमार यादव (३४), रोहित सचिन कांबळे २९) व अभय विशांत पोवार (२१, सर्व रा. भोई गल्ली) जखमी झाले. दगडफेकीत दोन दुचाकींचे नुकसान झाले. घटनास्थळी मोठा पोलिस (Kolhapur Police) बंदोबस्त तैनात केला होता. बिंदू चौकातून भोई गल्लीत (Bindu Chowk Bhoi Galli) जाणाऱ्या रस्त्यावरील ब्लू स्टार ग्रुपजवळ (Blue Star Group) काही तरूण बोलत थांबले होते. यावेळी येथून निघालेल्या निलेश यादव मोटारसायकलवरून पुढे जात होता. येथे थांबलेल्या तरुणांना त्याने बाजूला होण्यास सांगितले. यावेळी त्या तरूणांचा आणि निलेशचा वाद झाला. यानंतर दोन गट समोरासमोर येऊन दगडफेकीचा प्रकार घडला. यामध्ये अन्वर शेख, गौस बागवान यांच्या दारात उभ्या केलेल्या वाहनांचे जमावाकडून नुकसान करण्यात आले.दगडफेक व मारहाणीची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक आप्पासो पवार, पोलिस निरीक्षक दिलीप पवार, संजीवकुमार झाडे, उपनिरीक्षक भगवान गिरी, संतोष गळवे, विठ्ठल जाधव यांच्यासह फौजफाटा भोई गल्लीत दाखल झाला. दगडफेक, जखमींच्या नातेवाईकांकडे चौकशी सुरू केली होती. तसेच संशयितांची धरपकड करण्यासाठी पोलिस पाठविले. रात्री उशिरापर्यंत जाब जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.
