कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा लवकरच होणार सुरू

कोल्हापूर-दिल्ली विमानसेवा सुरू करण्यासाठी इंडिगो एअरलाइन्सच्या वतीने वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर-मुंबई सेवा देण्याचाही प्रयत्न असून स्टार एअरकडून कोल्हापूर-नागपूर मार्गावर सेवा सुरू करण्यासाठी चाचपणी सुरू आहे.या सेवा सुरू झाल्यास कोल्हापूरसह परिसरातील उद्योजक, व्यापारी वर्गाला मोठा फायदा होणार आहे.

सध्या इंडिगोकडून हैदराबाद- कोल्हापूर-तिरुपती व तिरुपती – कोल्हापूर -हैदराबाद आणि कोल्हापूर – बंगळूर विमानसेवा सुरू आहे. स्टार एअरकडून कोल्हापूर – मुंबई, कोल्हापूर – अहमदाबाद चार दिवस व कोल्हापूर – बंगळूर तीन दिवस विमान सेवा सुरू आहे. विंटर शेड्युल 28 मार्चला संपत आहे तर एक एप्रिलपासून समर शेड्युल सुरू होत आहे. या अनुषंगाने स्टार एअरलाइन्सकडून कोल्हापूर-नागपूर विमानसेवा सुरू होण्याची शक्यता आहे.

तर इंडिगो एअरलाइन्सकडून कोल्हापूर – दिल्ली विमानसेवा देण्याचा मानस असून यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. कोल्हापूर – मुंबई सेवेकरिताही पत्रव्यवहार व बोलणी सुरू आहेत. हैदराबादची प्रवासी संख्या चांगली असल्याने ही सेवा दोन सत्रांमध्ये कशी देता येईल, बंगळूरची सेवाही सकाळच्या सत्रात वाढवता येईल का, यासाठी इंडिगो एअरलाइन्स चाचपणी करत आहे.