आटपाडी , शहराच्या इतिहासाशी जोडलेले दोन्ही ओढे , शासकीय जागा आणि शहराच्या सरंक्षणासाठी बांधलेली मजबूत तटबंदीची सरंचना आज अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे. शासकीय जागांवर वेगाने होत असलेली बेकायदेशीर बांधकामे हटविण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
आटपाडी तलावापासून पाटील मळा , पांढरेवाडीपर्यंत सुमारे दोन – दीड किलोमीटरपर्यंतच्या ओढापात्रावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. ऐतिहासिक तटबंदीच्या सहा – सात फूट जाडीच्या वीस – पंचवीस फुटी भिंती आणि त्यावरील बुरुज यांच्या शेजारीच नवे बांधकाम उभे राहत आहे.
पूर्वी या ओढ्यांमधून खरसुंडी,बनपुरी,कामथ परिसरातून पाणी वाहत येत असे. मात्र दशकभरात हा प्रवाह जवळपास पूर्णतः बंद झाला आहे. ओढ्यांची पात्रे हळूहळू गिळंकृत होत आहेत . विशेषतः बाजार पटांगणाजवळ ओढा रुंदीला ८० ते ९० मित्र इतका आहे. त्यात दुकाने व घरे थाटली गेली आहेत .पावसाळ्यात या मार्गाने दुथंडी भरून पाणी वाहते. त्यामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
याशिवाय ब्राम्हण गल्ली परिसर, इनामदारवाडा आदी ठिकाणी ओढ्यात उतरण्याच्या पायऱ्या बघितल्या, तर अतिक्रमणे खूपच वाढली आहेत. जुनी तटबंदी व ओढापात्र कोणत्याही व्यक्तीच्या मालकीचे नसतानाही त्याची झालेली खरेदी-विक्री , नोंदी आणि बांधकामे बेकायदेशीर ठरली आहेत.
नागरिकांचे म्हणणे आहे कि, या सर्व अतिक्रमणांची महसूल , सिटी सर्व्हे व जुनी १९७५ पूर्वीची कागदपत्रे तपासून तातडीने चौकशी व्हावी आणि ओढापात्र मोकळे करण्यात यावे. राजकीय हस्तक्षेप , सडलेली प्रशासकीय यंत्रणा आणि वैयक्तिक लाभासाठी काहीही करण्याची वृत्ती मोडीत काढून ओढ्यांचा नैसर्गिक प्रवाह वाचवावा , तटबंदीच्या भिंती आणि ऐतिहासिक रचना जपून तो कायम राखण्याची नागरिकांची मागणी आहे.
