इस्लामपूर शहर जयंत पाटील यांचा बालेकिल्ला असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले लक्ष्य इस्लामपूर शहरावर केंद्रित केले. हातकणंगले लोकसभा मतदार संघातील इस्लामपूर शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे वर्चस्व असले तरी विरोधी भाजपची ताकद आजही एकवटलेली नाही.
त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचेच वर्चस्व होते. तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रचाराचा नवीन पॅटर्न भाजपमधील ओसवाल आणि पाटील बंधू यांनी राबविला. इस्लामपूर शहरात जयंत पाटील यांच्या गटाची सत्ता नसली तरी पदाधिकारी कार्यकर्त्यांची ताकद मोठी आहे. त्याखालोखाल भाजप पक्ष असला तरी स्वयंभू नेत्यांमुळे त्यांच्यात अंतर्गत मतभेद आहेत. त्यामुळेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार यांचा गट अग्रस्थानी दिसत होता.
शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचाराची सुत्रे शहरातील शिवसेनेच्या कार्यालयातून हालत होती. जयंत पाटील यांच्या जयंत नितीला शह देण्यासाठी शिवसेनेने प्रचारात नवीन पॅटर्नचा कानमंत्र भाजप आणि शिवसेनेतील कार्यकर्त्यांना दिला. यामध्ये महाडिक गटाचे भाजपचे माजी नगरसेवक कपिल ओसवाल, अमित ओसवाल, सुजित थोरात यांनी मतदारांना कानमंत्र देऊन विरोधकांच्या प्रचारातील हवा काढून घेण्याचा नवा डाव आखला होता.