इचलकरंजीतील लीड ठरवणार विजयी उमेदवार

हातकणंगले लोकसभा मतदार संघात कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, पन्हाळा शाहूवाडी आणि इचलकरंजी या विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळा या दोन विधानसभा मतदार संघ
येतात. यापैकी इचलकरंजी विधानसभा मतदार संघ हा एकमेव असा मतदार संघ आहे की येथे संपूर्ण शहरी मतदार आहे.

या मतदार संघात इचलकरंजी शहर, लगतचे कबनूर, कोरोची, खोतवाडी आणि चंदूर या गावांचा समावेश आहे. ही गाव सध्या इचलकरंजीचे उपनगरे झाली आहेत. त्यामुळे येथील संपूर्ण मतदार शहरी आहेत. त्यांना शेतकरी आणि उसाचे काहीही देणेघेणे नाही. इचलकरंजीचे मूळ प्रश्न आहे तो पिण्याच्या पाण्याचा आणि वस्त्रोद्योगचा. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यंदाही हातकणंगले लोकसभा मतदार संघ केंद्रबिंदू ठरला. जो तो उमेदवार इचलकरंजी विधासभा मतदार संघावरच तुटून पडला होता.

गेल्या निवडणुकीत धैर्यशील माने यांनी येथून ७५ हजाराचे लीड घेतले होते. सुरूवातीच्या टप्प्यात धैर्यशील माने आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्यात दुरंगी लढत होईल असे वाटत असतानाच शिवसेना उबाठा गटाचे सत्यजित पाटील सरूडकर यांना उमेदवारी मिळाली आणि निवडणुकीचे चित्रच पालटून गेले. त्यातच वंचित बहुजन आघाडीनेही उमेदवार दिल्याने सगळ्यांचीच पंचाईत झाली.

गेली निवडणूक पाणी प्रश्नावरून झाली असली तर अजून इचलकरंजीचा पाणीप्रश्न सुटला नाही. आपण तो पाणी प्रश्न सोडवू असे आश्वासन यंदाच्या उमेदवारांनी देखील दिले आहे त्यांच्या आवाहनाला किती प्रतिसाद मिळाला आहे हेही पहावे लागेल. यंदाही इचलकरंजी विधानसभा मतदार संघ येथील लीड उमेदवाराला विजयापर्यंत घेवून जाणार यात शंका नाही. त्यामुळे इचलकरंजीच ठरविणार विजयी उमेदवार असे समिकरण बनले आहे.