महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाच्या मुद्द्यावरून सर्वाधिक चर्चेत आलेला मतदारसंघ म्हणजे सांगली. ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील हे आग्रही होती. पण सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाच्या वाट्याला गेल्यानंतर विशाल पाटलांनी या ठिकाणी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढली. 7 मे रोजी सांगली लोकसभेसाठी मतदान पार पडलं. सांगलीच्या जागेसाठी भाजपचे संजयकाका पाटील आणि विशाल पाटील यांच्यामध्येच खरी लढाई असल्याची चर्चा आहे.
राज्यात सर्वत्र अठराव्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून उद्या 13 मे रोजी चौथ्या टप्पासाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. यंदाची लोकसभा ही महाष्ट्रातल्या अनेक मतदारसंघात अस्मितेची लढाई झाली आहे. त्यात प्रामुख्याने बारामती, सातारा, शिरूर, सांगली यांसारख्या अनेक लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष लागून राहिलं आहे. त्यामुळे यंदाच्या लोकसभेत कोण बाजी मारणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईलच.
या निकालाची उत्सुकता ज्याप्रमाणे राजकीय पक्ष, उमेदवार, कार्यकर्त्यांना आहे, तशीच ती सर्वसामान्यांना देखील आहे. निवडणुकांचा अंतिम कौल जाहीर होण्यास अद्याप अवकाश असला तरी त्याआधीच या निवडणुकांच्या निकालावरुन राज्यात अनेक ठिकाणी शर्यत आणि पैजे लागली आहे. अशातच चुरशीची लढत असलेल्या सांगली मतदारसंघातील उमेदवारांच्या विजयावरुन दोन कार्यकर्त्यांनी चक्क आपली दुचाकीच शर्यतीत लावली आहे.
निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वी सांगली लोकसभा मतदारसंघात दोन कार्यकर्त्यामध्ये पैजे लागल्याची एक पोस्ट सोशल मिडियावर तूफान वायरल होते आहे. यात असे म्हटले आहे की, सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलाणी यांना देण्यात येईल. तसेच संजयकाका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलाणी यांचेकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचे यात नमूद केलं आहे. तर या पैजेसाठी काही लोकांना साक्षीदार म्हणून त्यांचे नाव आणि स्वाक्षरी देखील घेतली आहे. आता सांगली लोकसभेत कोण बाजी मारणार आणि कोणाला माघार घ्यावी लागणार हे येत्या 4 जूनला स्पष्ट होईल. मात्र, या पैजेची उत्सुकताही आता सांगलीकरांना लागली आहे.