आष्टा शहरातील सोमेश्वर मंदिरासमोरील सोमलिंग तलावाचे केंद्र शासनाच्या विशेष अनुदान योजनेंतर्गत ५ कोटी ४० लाखांतून सुशोभिकरण करण्यात येणार आहे. प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आष्टा नगरीत महादेवाची सात लिंग आहेत. आठवे लिंग कृष्णा नदीकाठी आहे. केंद्र शासनाच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून आष्टा शहरातील सात लिंगांचा आमदार विलासराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जीर्णोद्धार केला आहे.
शहरातील सोमलिंग तलावाच्या शेजारीच महादेवाचे पुरातन असे हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिरात प्रतिवर्षी महाशिवरात्री तसेच श्रावण सोमवार या काळात मोठी गर्दी होत असते. सोमेश्वर मंदिरासमोरील सोमलिंग तलाव सुशोभिकरणासाठी ५ कोटी ४० लाख रुपये मंजूर झाले असून, यामधून बोटिंग क्लब, सिटी पार्क, प्रेक्षक गॅलरी, पाण्यातील गॅलरी, बैठक व्यवस्था, नयनरम्य बगीचा, खाऊगल्ली, अत्याधुनिक आकर्षक विद्युत रोषणाई, स्वच्छतागृह, तलावासाठी चेनलिंग कंपाऊंड, पार्किंग व्यवस्था, आकर्षक प्रवेशद्वार सुरक्षारक्षक केबिन करण्यात येणार आहे.
या तलावाच्या सुशोभीकरणामुळे आष्ट्याच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. तसेच नागरिकांनाही याचा विरंगुळा करण्यासाठी उपयोग होणार आहे. सोमलिंग तलावाच्या सुशोभिकरणामुळे आष्टा शहरातील नागरिकांना आता त्यांना त्यांची हक्काची बाग मिळणार असून, केवळ बागच नव्हेतर यामुळे येथील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. आष्टा शहरातील सोमलिंग तलाव परिसराचा कायापालट करण्यासाठी वेळोवेळी प्रयत्न केले. या प्रयत्नांना यश आले असून, शासनाने सुशोभिकरणासाठी पाच कोटी चाळीस लाख रुपये मंजूर केले आहेत.