अण्णाभाऊंचे विचार जोपासणे गरजेचे – डॉ. वायदंडे

भावी पिढीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समजण्यासाठी समाजाने त्यांचे विचार जोपासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ. सुधाकर वायदंडे यांनी केले. आष्टा- मिसाळवाडी येथे अण्णाभाऊ साठे जयंतीचे औचित्य साधून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असे नामकरण करून फलकाचे अनावरण डॉ. वायदंडे (Dr. Vayadande) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. वायदंडे म्हणाले, अण्णाभाऊंचे पुतळे व स्मारके परदेशात तसेच देशात व महाराष्ट्रात विविध ठिकाणी झालेले आहेत. पण ज्या तालुक्यात या महापुरुषाचा जन्म झाला त्या तालुक्याच्या ठिकाणी मात्र पुतळा व स्मारक होत नाही ही खेदजनक, संतापजनक व समाजाच्या भावना दुखावणारी बाब आहे. तालुक्याच्या ठिकाणी अण्णाभाऊंचा पुतळा व भव्य स्मारक व्हावे यासाठी तीव्र लढा उभा करणार असल्याचे डॉ. वायदंडे यांनी शेवटी सांगितले. 

यावेळी दलित महासंघाचे प.महा कार्याध्यक्ष सदाभाऊ चांदणे, ता. अध्यक्ष नारायण वायदंडे, युवक जि. उपाध्यक्ष अमोल लोखंडे, युवक आघाडी आष्टा शहर अध्यक्ष सुजित वारे, शिराळा ता. अध्यक्ष प्रभाकर तांबरे, ज्येष्ठ मार्गदर्शक सुरेश वारे, अक्षय वारे, तानाजी वारे, धनाजी वारे, संदेश वारे, प्रशांत वारे, आदित्य वारे, यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.