तुंग येथे महाविकास आघाडीच्या निवडणूक प्रचाराचा प्रारंभ मंगळवारी झाला. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी मुख्यमंत्रीपदाच्या स्वप्नावरून जयंत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्याचा समाचार जयंत पाटील यांनी तुंग येथील सभेत घेतला. ते म्हणाले, मुख्यमंत्री महाविकास आघाडीचाच होणार आहे. पण, आम्हाला डिवचून तुम्हाला काय फायदा होणार? तुम्ही तर पक्ष फोडूनही उपमुख्यमंत्रीच राहिलात.
मला विरोध करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की, वाळव्याचे पाणी फार वेगळे आहे. त्यात तुंगाच्या हनुमानाचा मला आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्हाला आता मुख्यमंत्री होऊनच दाखवतो, अशा शब्दांत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना अप्रत्यक्ष प्रत्युत्तर दिले.
पाटील म्हणाले की, महायुतीचे सरकार भ्रष्टाचाराने बरबटले आहे. फेक नैरेटिव्ह पसरले जात आहेत. जाती-जाती अन् समाजामध्ये भांडणे लावण्याचे एकमेव काम ते करताहेत. त्यामुळे या सरकारला महाराष्ट्राची जनता कंटाळली आहे. राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. पण, कार्यकर्त्यांनी गाफिल राहू नये. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना साथ द्यावी. ते म्हणाले, लाडकी बहीण योजना सुरू असली, तरी महागाईने कळस गाठला आहे. जीवनाश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत. पेट्रोल, डिझेलही लोकांना परवडेना झाले आहे, तर शेतीमालाचे भाव पूर्ण घसरले आहेत.
अतिवृष्टी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळाली. नाही, अशी अवस्था या सरकारची आहे. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल प्रचंड असंतोष आहे. यावेळी भालचंद्र पाटील, चिमण डांगे, वैभव शिंदे, अशोकराव चव्हाण, वैभव पाटील, आनंदराव नलवडे, महावीर चव्हाण, भास्कर पाटील, भरत देशमुख, शकील सय्यद, विकास कदम, कैलास आवटी, श्रीबाळ वडगावे आदी उपस्थित होते.